सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना २४ वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी

नवी दिल्ली – दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना दोषी ठरविण्यात आले आहे. दिल्लीतील साकेत कोर्टाने शुक्रवारी हा निर्णय दिला आहे. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट राघव शर्मा यांनी पाटकर यांना आज गुन्हेगारी मानहानीप्रकरणी दोषी ठरवले. यामुळे मेघा पाटकार यांना दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
व्ही. के. सक्सेना यांनी नर्मदा बचाव आंदोलन (एनबीए) विरुद्ध जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल मेधा पाटकर यांचाविरुद्ध २००० साली तक्रार दाखल केली होती. तेव्हा सक्सेना हे अहमदाबादस्थित एनजीओ नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीजचे प्रमुख होते. एका टीव्ही चॅनलवर आपल्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल आणि बदनामीकारक प्रेस स्टेटमेंट जारी केल्याबद्दल सक्सेना यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन खटलेही दाखल केले होते.





