महिनाभरात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बेशिस्त वाहन चालकांवर होणार कारवाई

पोलीस आयुक्त बिष्णोई यांची माहिती :शहरात 1150 कॅमेरे
पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरात 1150 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे आगामी महिनाभरात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली.
बजाज कंपनीतर्फे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाहतूक पोलिसांना जॅकेट्स, मास्क, बॅटन आणि गॉगल्स अशा सुरक्षा साहित्याचे वाटप हिंजवडी इंडस्ट्रियल असोशिएशनच्या कार्यालयात करण्यात आले. त्यावेळी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त नीलिमा जाधव, बजाज कंपनीचे संजय खडसे, समीर चौघुले, वाहतूक विभागाचे सर्व पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस आयुक्त बिष्णोई म्हणाले की, शहरासाठी स्मार्ट सिटी योजनेतून आगामी काळात साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यापैकी काही ठिकाणी पोलीस नियंत्रण कक्षातून सूचना देण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तसेच कोणत्या दिशेने वाहतूक जादा आहे हे पाहून निर्णय घेणारी स्वयंचलित वाहतूक नियंत्रण यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या कामाची सुरुवात झालेली आहे. मात्र तोपर्यंत सध्या असलेल्या कॅमेऱ्यांच्या आधारे कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक शाखेत काम सुरू असून एक महिन्याच्या आत ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. बेशिस्त वाहन चालकांना ऑनलाइन दंड आकारण्यात येणार आहे.
बजाज कंपनीचे संजय खडसे म्हणाले, पोलिसांचे सहकार्य नेहमी मिळते. पोलीस समाजाची सेवा करतात. बजाज कंपनीला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. सूत्रसंचालन वाहतूक पोलीस विभागाच्या सहायक आयुक्त निलिमा जाधव यांनी केले. तर आभार निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी मानले.
पोलिसांसाठी “ऑक्सिजन’
पोलिसांचे काम कायम प्रदूषणात असते. त्यामुळे त्यांच्या शरीरात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढते. हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक वाहतूक विभागात काही रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. वाहतूक पोलिसांना संबंधित रुग्णालयात ऑक्सिजन घेण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे. बजाज कंपनीने सीएसआर फंडातून जॅकेट, लाठी, रिफलेक्टर, मास्क, गॉगल आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे पोलिसांना त्यांच्या कामात मोठी मदत होणार आहे. ऑक्सिजन सेवेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.





