जिल्हा शल्य चिकित्सक; सांगलीतील रुग्णांची प्रकृती स्थिर
सांगली – सांगली जिल्ह्यात नऊ करोना बाधितांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यात कोणतीही नवीन लक्षणे आढळली नाहीत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.
डॉ. साळुंखे म्हणाले, “जिल्ह्यात एकूण 49 लोकांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी नऊ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरितांचे स्त्राव निगेटीव्ह आले आहेत. 12 व्यक्तींचा रिपोर्ट अद्यापही आलेला नाही. तो उद्यापर्यंत प्राप्त होईल.’ ते म्हणाले, “”काही खासगी दवाखाने बंद आहेत. याबाबत अनेक तक्रारी आहेत. दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील त्यांची नोंदणी रद्द करण्याइतपत जिल्हा प्रशासन कारवाई करू शकते, याची जाणीव डॉक्टरांनी ठेवावी.
त्यामुळे दवाखान्यांना कुलुपे लावून बंद ठेवू नयेत. शासकीय यंत्रणेतील डॉक्टरांनी अशा प्रसगांमध्ये पुढे येऊन काम करावे. अशा प्रसंगामध्ये कोणी खासगी डॉक्टर त्यांचे दवाखाने बंद ठेवत असतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई तात्काळ केली जाईल.’ कर्मचारी दवाखान्यात येत नाहीत या सबबीवर काही डॉक्टर दवाखाने बंद ठेवत आहेत.
आपण आपल्या दवाखान्याची ओळखपत्रे कर्मचाऱ्यांना द्यावीत. गरज पडल्यास हॉस्पिटलचे संचालक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संयुक्त सहीचे ओळखपत्र देण्याचाही विचार सुरू आहे. पोलीस सोडत नाहीत, असे कारण पुढे करून वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी बाहेर पडत नसतील तर त्यांच्यावरही आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.