Pune : नववर्षात नळजोड तोडण्याची कारवाई

पुणे : महापालिकेडून वारंवार नोटिसा बजावूनही महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी भरण्याकडे दुलर्क्ष करणे पुणेकरांना चांगलेच भोवणार आहे. ज्या मिळकतधारकांनी थकबाकी भरलेली नाही, त्यांचे नळजोड तोडण्यात येणार आहे. त्यासाठी मध्यवर्ती झोनसह पाच परिमंडळ स्तरावर पाच पथके नेमण्यात आली असून, याची कारवाई उद्यापासून (१ जानेवारी) सुरू करण्यात येणार आहे. कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी ही माहिती दिली.
महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी १० हजार कोटींच्या वर गेली आहे. यात सुमारे साडेतीन लाख थकबाकीदार नियमित कर भरत नाहीत, तर २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात या विभागास २७२७ कोटींच्या करवसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत १९०० कोटींचा कर वसूल झाला आहे, तर थकबाकी वसुलीसाठी २ डिसेंबरपासून प्रशासनाने बँड पथकासह मिळकती सील करण्याची मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत सुमारे ७१ कोटी ४१ लाखांचा मिळकतकर वसूल झाला आहे. मात्र, त्यानंतरही अनेक थकबाकीदार महापालिकेची बिले भरण्यास तयार नाहीत, तसेच उडवाउडवीची कारणे देत महापालिकेची कारवाई टाळली जात आहे.
परिणामी महापालिकेने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच कारवाईचा बडगा उभारण्याचा निर्णय घेतला असून, आता वसुली पथकांसोबतच १ प्लंबर व तीन बिगारी सेवक व त्या- त्या भागातील पेठ निरीक्षक असणार आहेत. थकबाकी न भरल्यास ताबडतोड नळजोड तोडले जाणार आहेत, तसेच जोपर्यंत बिलाची पूर्ण रक्कम भरली जात नाही, तोपर्यंत नळजोड पूर्ववत केला जाणार नाही.
गावांचा राग पुणेकरांवर?
महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये महापालिकेकडून आकारण्यात आलेल्या मिळकतकरास ग्रामस्थांचा विरोध आहे. त्यामुळे शासनाने या गावांमधील मिळकतकराची वसुली विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी थांबविली आहे. त्याचा फटका महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नास बसला आहे. ही रक्कम जवळपास ३०० ते ४०० कोटींची आहे. त्यामुळे या विभागाचे उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे. तर शासन या स्थगितीबाबत कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही. त्यामुळे महापालिकेकडून शहरातील थकबाकीदारांचे नाक दाबण्यास सुरुवात केली असून, मिळकती सील करण्यासोबतच आता त्यांचा पाणीपुरवठाही तोडला जाणार आहे.




