बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे आरोपी खोक्या भोसले याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले आहेत. वन विभागाने खोक्याच्या घरावर तोडक कारवाई केली होती. त्यानंतर त्याच रात्री अज्ञात इसमांनी त्याच घर जाळून टाकलं. यामुळे खोक्याच्या घरच्यांनी संताप व्यक्त करत न्याय मागितला होता. त्यानंतर आज आमदार सुरेश धस हे शिरूर कासार गावात आम सभेसाठी आले असता त्यांनी खोक्या भोसले याच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. यावेळी सतीश भोसले याच्या परिवाराने त्यांना आपबिती सांगितली. त्यानंतर सुरेश धस यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. खोक्या हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सुरेश धस म्हणाले की, माध्यमांनी खोक्याला किती मोठा गुंड केला? त्याला किती मोठा पैसेवाला केला. त्यानंतर विभागाने खोक्याचे घरही पाडले. कोणतीही नोटीस न देता ही कारवाई करण्यात आली आहे. त्याने जे केले त्यासाठी खोक्याला अटक केली आहे. तो त्याची शिक्षा भोगत आहे. पण वन विभागाने कारवाई नोटीस न देता केली आहे. ही कारवाई वन विभागाने कोणत्या नियमांनी केली? या प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळाले तर चांगलं होईल. सतीश भोसलेचे कुटुंब या घरात १०० वर्षांपासून राहत आहे. तरीही कारवाई केली गेली. जितका मोठा गुंड त्याला केला तेवढा तो नाही आहे. त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा खोक्याला मिळाली. पण आता त्याची परिस्थिती काय केली. आता राहायला घरही नाही ठेवलं, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. खोक्या बीड जिल्ह्यातून हद्दपार खोक्यावर शिरुर कासार, पाटोदा, अंमळनेर पोलिस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे नोंद होते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खोक्या भोसलेवर हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याची बीड जिल्ह्यातून हद्दपारी करण्यात आली आहे. याबाबचे पत्र शिरुर कासार पोलिसांना देण्यात आले. त्यामुळे, उत्तर प्रदेशच्या दिशेने पळून गेलेला खोक्या आता बीड जिल्ह्यातून हद्दपार असणार आहे. कोण आहे सतीश भोसले? सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद होते. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले.अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे.