Nagar | बोगस डाॅक्टरांवर कारवाईचे आदेश

नगर,(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मुला-मुलींच्या लिंगगुणोत्तराचे प्रमाण समान राहील यादृष्टीने गावपातळीवर मुलींच्या जन्माविषयी नागरिकांच्या विचारात बदल होण्याकरीता जनजागृती करावी.
तसेच जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरोग्य विभागाच्या विविध योजना तसेच समित्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे,
पीसीपीएनडीटी समितीच्या अशासकीय सदस्य डॉ सुधा कांकरिया, शासकीय अभियोक्ता ॲड. सतीष पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान, रुग्णकल्याण समिती, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण आदींचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला.
मुला-मुलींच्या लिंगगुणोत्तराचे प्रमाण समान राहील यादृष्टीने गावपातळीवर मुलींच्या जन्माविषयी नागरिकांच्या विचारात बदल होण्याकरीता जनजागृती करावी.
अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, ए. एन. एम. नर्स यांची याकामी मदत घेण्यात यावी. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा समितीमध्ये समावेश करण्यात यावा. जिल्ह्यात विनानोंदणी तसेच अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर विनाविलंब कारवाईचे आदेश त्यांनी दिले.
तसेच जिल्हा २०२५ पर्यंत क्षयमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक दक्षपणे काम करावे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील कुटूंबांच्या तपासण्या करण्यात याव्यात. जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात यावे.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व परिसर तंबाखुमुक्त करण्यासाठी परिसरामध्ये चालविण्यात येणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.





