उजनी धरणात वाळू चोरांवर धडक कारवाई; बोट नष्ट, साहित्य जप्त!

इंदापूर – उजनी धरण परिसरातील वाळू चोरी रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करत इंदापूर तालुक्यातील महादेव नगर येथे एक बोट नष्ट केली. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जीवन बनसोडे आणि पोलीस निरीक्षक श्रीकांत कोकणे यांच्या नेतृत्वात ही कारवाई 30 एप्रिल रोजी झाली.
यापूर्वी नष्ट केलेली हीच बोट दुरुस्त करून पुन्हा वाळू चोरीसाठी वापरली जात होती. कारवाईत बोटीसह ऑक्सिजन सिलिंडर, व्यावसायिक गॅस सिलिंडर, वेल्डिंग, गॅस कटर, 80 लिटर डिझेल आणि स्टेनलेस स्टील अँगल जप्त करण्यात आले.
इंदापूर मंडळ अधिकारी श्याम झोडगे, माळवाडी मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे, ग्राम महसूल अधिकारी वैभव मुळे, पोलीस पाटील सुनिल राऊत, अरुण कांबळे, बाळासाहेब कडाळे, पोलीस कर्मचारी विनोद रासकर आणि नंदू जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.
तहसीलदार बनसोडे म्हणाले, “बोटीचे मालक आणि दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणेवर गुन्हे दाखल केले जातील.” वाळू चोरीमुळे पर्यावरण आणि धरणाच्या संरचनेला होणारा धोका लक्षात घेता प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत होत आहे.




