पुणे जिल्हा | वाहतूक विभागाकडून 85 बुलेटवर कारवाई

लोणी काळभोर (वार्ताहर)- कर्णकर्कश्श आवाज करणार्या बुलेटच्या सायलेन्सरवर लोणी काळभोर वाहतूक पोलिसांकडून गेल्या महिन्याभरापासून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. मागील 22 दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी विशेष मोहीम राबवून 85 बुलेटवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी दिली.
सायलेन्सर बदलून कानठळ्या बसवणारा, आवाज काढणार्या या वाहनचालकांकडून 1 लाख 27 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. फट्फट् आवाज करत बुलेटमधून फटाके फोडण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. याचा आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो.
विशेषत: लहान मुले, वृद्ध आणि महिलांनाही हा त्रास सहन करावा लागतो. रात्री-अपरात्री फटाके वाजल्याप्रमाणे हे सायलेन्सर आवाज काढतात. अशा वाहनधारकांवर यापुढे देखील अशाच प्रकारे कारवाई केली जाणार असल्याचे कुमार घाडगे यांनी स्पष्ट केले.
दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा ’लूक’ बदलताना काहींकडून वाहनांच्या मूळ स्वरुपात बदल केला जातो. यासाठी काही पार्टस् बदलून फेरफार केला जातो. त्यामुळे वाहनाच्या मूळ रचनेत बदल होतो. परिणामी, ध्वनी व वायू प्रदूषण होऊ शकते. त्यामुळे वाहनाच्या मूळ रचनेत बदल करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. अशा वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व वाहनचालकांना ज्यांच्या वाहनात फटाके फोडणारे सायलेन्सर किंवा कर्णकर्कश्य आवाज करणारे हॉर्न लावले आहेत. त्यांनी तत्काळ सायलेन्सर काढावेत. अन्यथा कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कर्णकर्कश्य आवाज करणार्या बुलेटचा नंबर पोलिसांना द्यावा, नागरिकांचे नाव गुपित ठेवले जाईल व त्या बुलेट चालकावर कारवाई करून दंड वसूल करण्यात येईल. -कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा





