Rajasthan Election: 10 दिवसांत 143 कोटींची दारू, सोने आणि रोकड जप्त

जयपूर – राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या 10 दिवसांत पोलीस, आयकर आणि उत्पादन शुल्क विभागासह विविध यंत्रणांनी 143 कोटी रुपयांहून अधिक किमतीची अवैध दारू, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
2018 च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात 65 दिवसांत 70 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते, तर यावेळी केवळ 10 दिवसांत त्याच्या दुप्पट रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी दिली आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत 7 लाख 95 हजार 978 लिटर दारू (15 कोटी 37 लाख रुपये), 26 कोटी 27 लाख रुपये रोख, 38.94 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि 15.72 कोटी रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. चांदीसारखे मौल्यवान धातू जप्त करण्यात आले. जयपूरमध्ये सर्वाधिक 21 कोटी 20 लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गुप्ता पुढे म्हणाले की, 21 कोटी 20 लाख रुपयांचे साहित्य जप्त करून जयपूर आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर उदयपूर (11 कोटी 20 लाख रुपये), तिसऱ्या क्रमांकावर बारमेर (9 कोटी 80 लाख रुपये), चौथ्या क्रमांकावर भिलवाडा (9 कोटी 49 लाख रुपये) आहे.
अलवरमध्ये 8.31 कोटी रुपये, जोधपूरमध्ये 8.26 कोटी रुपये, श्रीगंगानगरमध्ये 7.17 कोटी रुपये, सीकरमध्ये 6.63 कोटी रुपये, चित्तोडगडमध्ये 6.53 कोटी रुपये आणि पालीमध्ये 5.26 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.





