यशवंत जाधव यांच्यावरील कारवाई; देवेंद्र फडणवीस म्हणाले,”त्यांनी सभागृहातच…”

मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर आता त्यांची चौकशी केली जात आहे. यशवंत जाधव यांच्या डायरीमध्येकोट्यवधींच्या भेटवस्तू ‘मातोश्री’ला दिल्याचा उल्लेख असल्याची माहिती उघड झाली आहे. यासंदर्भात प्राप्तीकर विभाग अधिक तपास करत असून त्यावरून आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात,” त्यांनी सभागृहातच सांगितलं की २४ महिन्यांत ३८ मालमत्ता त्यांनी खरेदी केल्या आहेत. दोन वर्ष कोविड होता. पण कोविडच्या नावावर मुंबई महानगर पालिकेला कसं लुटलं जातंय, हा आरोप आम्ही केला होता. आम्ही जे म्हटलं होतं ते आता खरं ठरत आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये ‘२ कोटी आणि भेटवस्तू मातोश्रीला दिले’ असल्याची नोंद असल्याचं प्राप्तीकर विभागाच्या तपासात समोर आल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तात दिली आहे. मात्र, मातोश्री म्हणजे हे पैसे आपल्या आईला दिल्याचं यशवंत जाधव यांनी जबाबात म्हटल्याचं देखील या वृत्तात नमूद केलं आहे. यावरून आता राज्यात नव्याने राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
साधारण महिन्याभरापूर्वी प्राप्तीकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित इतर ठिकाणी छापे टाकण्यात आले. मुंबईतल्या एकूण ३३ ठिकाणी विभागानं शोध घेतल्याचं देखील सांगितलं गेलं.





