पिंपरी | लोणावळ्यात १२ पर्यटकांवर कारवाई

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहरातील भुशी धरण मार्गावर असलेल्या सहारा पुलाच्या पुढे असणाऱ्या तीन धबधब्यांच्या वरील बाजूस डोंगरकड्यावर जाण्यास प्रशासनाची मनाई असतानाही आदेश धुडकावून धोकादायकरित्या डोंगर चढून जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या १२ पर्यटकांवर वनविभाग आणि लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
भुशी धरणावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपूर्वी पुणे जिल्हाधिकारी यांनी स्वतः आदेश काढत धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घातलेली आहे. यात सहारा पुलाच्या समोरच्या बाजूला असलेल्या तीन छोट्या धबधब्याच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे.
पोलीस, वनखाते तशा सूचना पर्यटकांना देत असतात. मात्र तरीही या सुचनांकडे कानाडोळा करून अनेक अतिउत्साही पर्यटक नको ते धाडस करायला जातात त्यामुळे आता या अशा नाठाळ पर्यटकांवर थेट कारवाई करण्याचे पाऊल पोलीस प्रशासन आणि वनखात्याने उचलले असून भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे या पर्यटकांवर कारवाई केली जात आहे.
रविवारी सकाळपासूनच लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप आणि वनपाल सागर चुटके हे महिला पोसई पाटील, पो. कॉ. पवन कराड पो.कॉ.रईस मुलाणी आदींसह सीझन बंदोबस्त करीत होते.
सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास सहारा ब्रीज समोरील डोंगरावर धबधब्याच्या वरील डोंगर भागात तसेच घुबड तलाव परिसरात काही पर्यटक हे मनाई हुकुम असतानाही त्याठिकाणी फिरत असताना आढळून आले. या सर्वांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २२३ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
वरील प्रकरणी वनविभागाचे संदीप रामगुडे यांनी फिर्याद दिली असून सुधर्म नितीन शेटे, हर्ष संतोष पंडीत (दोघेही रा. भिलार ता. महाबळेश्वर जि. सातारा), दिनानाथ सुरेद्र पासवान (रा. चारकोपमाय कोळीवाडा कांदीवली वेस्ट मुंबई), लवकुश सोहनलाल गुप्ता, रविकुमार बबलुकुमार गौतम (रा. डिगेश्वर कांदीवली वेस्ट मुंबई),
ऋषीकेश श्रीधरराव सांळुके (रा. जंगददा किराण दुकानाजवळ दत्तनगर जि. बीड), तन्मय अजय तेलवेणे (रा. बेदवाडा मुरबाड, मुंबई), हरिओम घनश्याम पासवान, गणेश महादेव पासवान, गुड्डू राजू पासवान, धर्मेंद्र भुलई पासवान, किसन उर्फ क्रिशकुमार बालकराम पासवान (सर्व रा. गुरुकुल कॉलनी, काळेवाडी, पुणे) या १२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पो. हवा. शकील शेख हे करीत आहे.





