पुणे | पराभवानंतर काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघात विजयाची आशा पल्लवित झालेल्या काँग्रेसला पुण्यात पराभवाचा धक्का बसला आहे. त्यातच या निवडणुकीसाठी पुण्यात तळ ठोकून असलेल्या नेत्यांना स्थानिक पातळीवरील नेते आपल्याकडे असलेल्या विधानसभा मतदारसंघातील मतदानाचे गणित समजावताना ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे सांगत होते.
मात्र, प्रत्यक्षात शिवाजीनगर आणि काॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ वगळता इतर ठिकाणी काँग्रेसला मोठा धक्का बसला. जबाबदारी असलेले पदाधिकारीच प्रचारातून गायब असल्याने ही स्थिती उद्भवली, या मुद्द्यावरून काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांबाबत नाराजी सुरू झाली आहे, तर काही पदाधिकाऱ्यांकडून या पराभवांची कारणमीमांसा पक्षातील वरिष्ठांना कळवून विधानसभा निवडणुकीवेळी तरी हे प्रकार थांबवा, अशी मागणी केली जाणार आहे.
नेत्यांनाही ठेवले अंधारात
राहुल गांधी यांच्या सभेनंतर पुण्यात काँग्रेसला पोषक वातावरण तयार झाले होते. त्यानंतर या ठिकाणी भाजपला आपण टक्कर देऊ शकतो, अशी काँग्रेस नेत्यांना आस वाटल्याने राज्यातील डझनभर आमदारांची फौज देण्यात आली होती.
त्यांनीही शहरातील वातावरण समजून घेत स्थानिक नेत्यांवर प्रत्येक विधानसभेची जबाबदारी दिली. त्यानंतर हे आमदार या नेत्यांकडून प्रचार, मतदारांचा आढावा घेत राहिले. त्यात या नेत्यांकडून जे आकडे देण्यात येत होते, तसेच स्थानिक पातळीवरचे जे चित्र रंगविले जात होते, ते या निकालाने उघडे पडले आहे.
दावे ठरले खोटे
शहरातील कोथरूड वगळता इतर सहा मतदारसंघांत काँग्रेसलाच मतदान झाल्याचा दावा हे नेते आकड्यांसह करत होते, तसेच निवडणूक अटीतटीची होईल, असे सांगत नेत्यांपुढे बढाया मारत होते. मात्र, प्रत्यक्षात निकालानंतर सर्वच नेत्यांचे दावे खोटे ठरले असून, भाजपचे मताधिक्य मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत घटले असले, तरी तब्बल सव्वा लाख मतांनी मजबूत विजय मिळविला आहे.





