विखे – थोरात यांच्यात आरोप-प्रत्यारोप

संगमनेर -कॉंग्रेस पक्ष हा गोरगरिबांच्या विकासाचा विचार आहे. याच विकासाच्या विचारांवर देशाने 70 वर्षांत मोठी प्रगती साधली असून, हाच विचार घेऊन विखेही मोठे झाले आहेत. मात्र, त्यांनी पक्षाला अडचणीत आणून पक्षांतर केल्याने त्यांनी आता कॉंग्रेसची काळजी करू नये. तसेच संगमनेरमध्ये लक्ष देण्याऐवजी शिर्डी मतदारसंघातील जनतेची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी केले आहे.
कानवडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कॉंग्रेसचे आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका विकासकामांमुळे सर्व क्षेत्रात प्रगतीवर आहे. किंबहुना विकासाचा मापदंड म्हणून संगमनेरकडे पाहिले जाते. हे त्यांना पाहवत नाही. राहाता मतदारसंघात विकासाची अवस्था वाईट आहे.
तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रांची वाईट अवस्था आहे. सर्वच बाबतीत शिर्डी मतदारसंघ हा पिछाडीवर पडलेला असताना तेथील जनतेला वेळ देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी फक्त राजकारण म्हणून आ. विखे संगमनेर मतदारसंघात विनाकारण ढवळाढवळ करत आहेत. भाजपमध्ये आता ते चौथ्या लाईनला बसताहेत. यावरून त्यांची अवस्था राज्याला व शिर्डीतील जनतेलाही कळाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.





