Accident : भररस्त्यात महाराष्ट्रातील बड्या अधिकाऱ्याला कारनं उडवलं, जागीच मृत्यू; अपघात की घातपात? चर्चांना उधाण
Accident : भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाल्याने या घटनेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, हा अपघात की घातपात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Accident : सातारा जिल्ह्यातील कराड शहरात शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील मृदू व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मण मंडले यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाल्याने या घटनेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, हा अपघात की घातपात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडले हे शनिवार-रविवारच्या सुट्टीसाठी आपल्या गावी जात असताना कराड शहरातील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलसमोर पहाटे साडेपाचच्या सुमारास रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की मंडले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहनचालकाने थांबण्याऐवजी वाहनासह पलायन केल्याने या प्रकरणाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली असून काही संशयितांची चौकशीही करण्यात येत आहे.
दरम्यान, सरकारी अधिकाऱ्याच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून अपघाताच्या सर्व अंगांनी तपास सुरू असून फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.





