Anuradha Paudwal : पतीचे अपघाती निधन, २०२० मध्ये मुलालाही गमावले; प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यातील मन हेलावणाऱ्या घटना
Anuradha Paudwal : अनुराधा पौडवाल यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील कारवार येथे एका मराठी कुटुंबात झाला.

Anuradha Paudwal : आपल्या सुमधुर आवाजाने अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा आज २७ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. त्या ७२ वर्षांच्या झाल्या आहेत. हिंदी आणि मराठी चित्रपटगीतांपासून भक्तिगीतांपर्यंत विविध प्रकारच्या गाण्यांना त्यांनी आपल्या आवाजाने वेगळी ओळख दिली. एकेकाळी बॉलिवूडमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अनुराधा यांनी अचानक चित्रपटगीतांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात मोठे यश आले, मात्र वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक दुःखद प्रसंगांना सामोरे जावे लागले.
लहान वयातच संगीत क्षेत्रात पदार्पण
अनुराधा पौडवाल यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील कारवार येथे एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव अलका नाडकर्णी होते. लग्नानंतर त्या अनुराधा पौडवाल या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांनी औपचारिकरीत्या संगीताचे प्रशिक्षण घेतले नसले, तरी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांसारख्या दिग्गज गायिकांची गाणी ऐकत त्यांनी स्वतःची गायनशैली विकसित केली.
१९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अभिमान’ या चित्रपटातून त्यांनी पार्श्वगायिका म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आणि आपल्या आवाजाची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
‘हिरो’ चित्रपटाने दिली विशेष ओळख
१९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरो’ चित्रपटातील ‘तू मेरा जानू है’ या गाण्यामुळे अनुराधा पौडवाल यांना विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘बहुत प्यार करते हैं’, ‘तू मेरी जिंदगी है’ आणि ‘नजर के सामने’ यांसारखी त्यांची अनेक गाणी लोकप्रिय झाली. रोमँटिक गाण्यांमधील त्यांचा मखमली आवाज श्रोत्यांच्या पसंतीस उतरला.
१९९०, १९९१ आणि १९९२ अशा सलग तीन वर्षांत त्यांनी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. या यशामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या गायिकांमध्ये त्यांची गणना झाली.
बॉलिवूडपासून दूर जात भक्तिगीतांकडे वळल्या
चित्रपटगीतांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवूनही अनुराधा पौडवाल यांनी १९९० च्या दशकात पार्श्वगायनापासून हळूहळू अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी भक्तिगीतांच्या गायनावर अधिक लक्ष केंद्रित केले. टी-सीरिजच्या माध्यमातून प्रदर्शित झालेल्या त्यांच्या अनेक भक्तिगीतांना श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
‘ओम जय अंबे गौरी’, ‘जय माँ अंबे’, ‘दुर्गा अमृतवाणी’, ‘महालक्ष्मी अष्टकम’ आणि ‘आरती कुंजबिहारी की’ यांसारख्या भक्तिगीतांमुळे त्या घराघरांत पोहोचल्या. चित्रपटसृष्टीतील बदलते स्वरूप आणि संगीत क्षेत्रातील परिस्थिती यांबाबत त्यांनी विविध मुलाखतींमध्ये भाष्य केले आहे. कालांतराने त्यांनी व्यावसायिक चित्रपटगीतांपेक्षा भक्तिगीतांना अधिक प्राधान्य दिले.
वयाच्या १५ व्या वर्षी विवाह; पतीच्या निधनानंतर आयुष्य बदलले
अनुराधा पौडवाल यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतार आले. त्यांचा विवाह संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी झाला. अरुण पौडवाल यांनी संगीत क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. या दाम्पत्याला मुले झाली; मात्र त्यांच्या कुटुंबावर पुढे दुःखाचे प्रसंग ओढवले.
१९९१ मध्ये अरुण पौडवाल यांचे रस्ते अपघातात निधन झाले. पतीच्या निधनाने अनुराधा यांना मोठा धक्का बसला. या कठीण काळानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत संगीत क्षेत्रातील काम सुरू ठेवले.
अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यातील आणखी एक दुःखद घटना म्हणजे त्यांचा मुलगा आदित्य पौडवाल यांचे निधन. मूत्रपिंडाच्या आजारामुळे २०२० मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी आदित्य यांचे निधन झाले. या घटनेने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांची मुलगी कविता पौडवाल ही संगीत क्षेत्रात सक्रिय आहे. एका जुन्या मुलाखतील अनुराधा यांनी त्यांना आणखी एक मुलगी होती तिचे जन्मानंतर काही दिवसांत निधन झाल्याचा खुलासा केला होता.
पुरस्कार आणि लोकप्रियतेचा समृद्ध प्रवास
अनुराधा पौडवाल यांची आजही जुनी चित्रपटगीते आणि भक्तिगीते रसिक आवडीने ऐकतात. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचूनही आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे गेलेल्या अनुराधा पौडवाल यांचा संगीतप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





