Latur Accident News : अपघाताचं सत्र सुरुचं, दोन ट्रॅव्हल्स एकमेकींवर धडकल्या; दोघांचा जागीच मृत्यू

लातूर : शहरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. दोन खासगी बसची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू, तर काही प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात तुळजापूर -लातूर महामार्गावरील आशीव पाटी येथे झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यावरून लातूरकडे जात असलेल्या एका खासगी बसने दुसऱ्या खासगी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात लातूर-तुळजापूर महामार्गावरील आशीव पाटी ते उजनी दरम्यान झाला आहे.
खासगी बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. १५ ते २० प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लातूरमध्ये अपघातात वाढ
दरम्यान, चारच दिवसांपूर्वी भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा याच लातूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांना गंभीर दुखापत झाली होती.
त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला नेले जात होते. पण या दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. आर. टी. देशमुख यांना पुढील उपचारासाठी लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.





