बुलंदशहर (लखनौ) : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात भीषण अपघात घडला आहे. अरनिया भागातील घटाल गावात ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ९ भाविकांचा मृत्यू झाला. या अपघातात 50 हून अधिक जण जखमी आहेत. घटनास्थळी जिल्हादंडाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांसह इतर अधिकारी पोहोचले आहेत. पोलीस पथकांकडून जखमींना रुग्णालयात पाठविले जात आहे. तर मृतदेह हे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले जात आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्री २.१० वाजेच्या सुमारास झाला. अलीगढ येथून ट्रॅक्टरमधून 60 ते 61 भाविक हे राजस्थानमधील जहारपीर येथे तीर्थयात्रेसाठी जात होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्टर पलटी झाले. अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 39 जणांना गंभीर दुखापत झाली. या जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण कासगंज जिल्ह्यातील रहिवासी होते. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांचा मृत्युबद्दल शोक व्यक्त केला. यावेळी त्यांनी जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये मदत जाहीर केली.