खालापूर : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील खालापूर हद्दीतील नवीन बोगद्यात शनिवारी (दि. २६) दुपारी दोन वाजताच्या सुमारास ब्रेक फेल झालेल्या कंटेनरमुळे भीषण अपघात झाला. कंटेनरने सुमारे पाच किलोमीटर अंतरात २५ ते ३० वाहनांना धडक दिली, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. या विचित्र अपघातामुळे संपूर्ण एक्सप्रेसवेवर वाहतूक खोळंबा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४६-बीयू-३५०६ क्रमांकाचा कंटेनर मुंबईकडे जात असताना खालापूर हद्दीतील नवीन बोगद्यात त्याचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे कंटेनर सुमारे पाच किलोमीटरपर्यंत मार्गातील बस, कार, ट्रेलर अशा अनेक वाहनांना अनियंत्रितपणे धडक देत फुडमॉलपर्यंत गेला. या भीषण अपघातात अनिता वेरवंडे (वय ३५) या महिलेला जागीच मृत्यू झाला. बसमधील १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर अनेक वाहनांमधील प्रवाशांना विविध स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. जखमींमध्ये लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी खोपोली व खालापूर पोलीस, हेल्प फाउंडेशनची आपत्कालीन सेवा टीम आणि स्थानिक स्वयंसेवकांनी धाव घेत मदतकार्य राबवले. वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कंटेनरचा ब्रेक फेल होण्यामागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.