Accident News : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 18 ते 20 वाहनांचा भीषण अपघात

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटाजवळ दत्ता फूडमॉलसमोर शनिवारी (ता. २६) भीषण अपघात घडला. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने १८ ते २० वाहने एकमेकांवर जोरदार आदळली, ज्यामुळे अनेक गाड्यांचा चक्काचूर झाला आणि काही प्रवासी गंभीर जखमी झाले.
हा द्रुतगती मार्ग भारतातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे. ज्यावर दररोज सुमारे दीड लाख वाहने धावतात, तर शनिवार-रविवारी हा आकडा २ लाखांवर जातो. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती, परंतु या अपघातामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडली. अपघातानंतर ४ ते ५ किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
अपघाताचे स्वरूप
लोणावळा-खंडाळा घाटातून खाली उतरताना दत्ता फूडमॉलजवळ कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने प्रचंड वेगात इतर वाहनांना धडक दिली. यात १८ ते २० वाहने एकमेकांवर आदळली, तर तीन वाहनांचा पूर्णपणे चुराडा झाला. अनेक प्रवाशी जखमी झाल्याचे समजत आहे.
वाहतूक व्यवस्थेवर परिणाम
अपघातानंतर जखमींना तात्काळ मदत देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. मात्र, अपघातग्रस्त वाहनांमुळे रस्ता अडवला गेल्याने ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अपघाताच्या ठिकाणी पोलिस आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत. तरीही, रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांना प्रचंड कसरत करावी लागत आहे.





