Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! कंटेनरच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर (Accident News) दुर्गामातेची मूर्ती घेऊन परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला.

Accident News : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर (Accident News) दुर्गामातेची मूर्ती घेऊन परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. मागून येणाऱ्या कंटेनर ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून, १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण शेगाव येथून दुर्गामूर्ती घेऊन बोलेरो पिकअपने वर्ध्याकडे परतत होते.
हा अपघात (Accident News) समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 97 परिसरात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
माहितीनुसार, वर्ध्यातील नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे कार्यकर्ते दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गामातेची मूर्ती आणण्यासाठी शेगाव येथे गेले होते. त्यांनी दुर्गामातेची उंच मूर्ती घेतली आणि बोलेरो पिकअप वाहनातून वर्ध्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. नवरात्रौत्सवासाठी मोठ्या उत्साहात तयारी सुरू असतानाच हा प्रवास दुर्दैवी ठरला.
समृद्धी महामार्गाने वर्ध्याच्या दिशेने येत असताना धामणगावजवळ त्यांच्या वाहनाला मागून ट्रकने धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, पिकअप वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि वाहनातील कार्यकर्ते गंभीर जखमी झाले.
काही कार्यकर्ते वाहनातून बाहेर फेकले गेल्याची माहिती असून अनेक जण गंभीर जखमी झाले. अपघाताची (Accident News) तीव्रता मोठी असल्याने मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.






