वाखारीजवळ अपघातात दोघांचा मृत्यू

यवत – पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीत वाकडा पुलाजवळ लक्झरी बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार (दि.26) रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. याप्रकरणी बाबासाहेब किसन महानवर (रा. भांडगाव, ता. दौंड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. अज्ञात लक्झरी चालकाविरोधात यवत पोलिसांनी दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला आहे.
अपघातात सुरेश शिवराम कदम (वय 46, रा. यवत, ता. दौंड) आणि धुळा शिवाजी कारंडे (वय 40, रा. भांडगाव, कारंडेवस्ती, ता. दौंड) मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश कदम हे आपली दुचाकीवरून धुळा कारंडे हे दोघे यवतवरून चौफुला बाजूकडे जात होते. दुचाकी वाखारी गावच्या हद्दीत वाकडा पुलाजवळ आली.
त्यावेळी पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी लक्झरी बसने पुढे चाललेल्या दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत सुरेश कदम व धुळा कारंडे हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना पुढील उपचारासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती दोघांना मृत घोषित केले. अपघातानंतर लक्झरी चालक पळून गेला.





