सांगलीत दोन कार धडकून भीषण अपघात; दाम्पत्याचा मृत्यू

सांगली : सांगलीतून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येथे दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सातारा जिल्ह्यातील खटाव मधील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. विकास मोहिते आणि पुष्पा मोहिते अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ही घटना सांगलीतील कडेगाव तालुक्यातील वांगी येथे घडली आहे.
खटाव येथील विकास भिकू मोहिते हे मोटारीतून वाळवा तालुक्यातील ताकारी येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटपून गुरुवारी रात्री उशिरा ते पत्नी पुष्पा आणि इतर नातेवाईकांसह वांगी कडेपूरमार्गे खटाव येथे परतत होते. याचवेळी जमीर ईलाही आवटी (रा. महाबळेश्वर, जि. सातारा) हा प्रवासी मोटार घेऊन महाबळेश्वरहून कडेपूर-वांगीमार्गे सांगलीच्या दिशेने निघाला होता. यावेळी कारने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दाम्पत्य जागीच ठार झाले. अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत.
ऋतुजा रोहित तोरसे, विजया प्रकाश तोरसे, आरोही रोहित तोरसे, आर्या अरुण तोरसे असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. प्रवासी मोटारीचा चालक जमीर आवटी हा देखील जखमी आहे. जखमींना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोन्ही मोटारींचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत ऋतुजा रोहित तोरसे (रा. खटाव) यांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


