Leh Accident: लग्नाला चाललेली बस 200 मीटर खोल दरीत कोसळली; 6 जणांचा मृत्यू, 19 जखमी

Leh Accident: लेहमधील दुर्गुक भागात गुरुवारी एक भीषण अपघात झाला. येथे स्कूल बसचा अपघात होऊन 200 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुमारे 19 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. लेहच्या उपायुक्तांनी सांगितले की, जखमींना लष्कर आणि सीएचसी तांगत्से आरोग्य सेवा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
बसमध्ये दोन मुले आणि 23 शालेय कर्मचाऱ्यांसह सुमारे 25 प्रवासी होते. बस एका कर्मचाऱ्याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी दुर्बुकला जात असताना दुर्बुकजवळ खोल दरीत कोसळली.
बचावकार्यात तीन हेलिकॉप्टर तैनात –
जखमींना लेह येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी प्रशासनाने तीन हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. भारतीय लष्कर, लडाख पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांनी मिळून जखमींना आरोग्य सुविधांपर्यंत पोहोचवण्यास मदत करून बचाव कार्ये वेगाने सुरू केले.





