अमेरिकेच्या सैन्यदलात तृतीयपंथीयांना प्रवेश बंद

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सैन्य दलामध्ये आतायापुढे तृतीयपंथीयांना प्रवेश दिला जाणार नाही, असे सैन्य दलाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. तसेच सैन्य दलामधील भरतीसाठी लिंग परिवर्तनाची सुविधा देखील तांबवण्यात येणार आहे. या संबंधीची घोषणा एक्स या सोशल मीडियावर करण्यात आली आहे.
हा निर्णय तातडीने लागू करण्यात येणार असून यापुर्वी ज्या तृतीयपंथीयांना भरती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, ती देखील थांबवण्यात येणार आहे. लिंग परिवर्तनाशी संबंधित सर्व प्रक्रिया देखील थांबवण्यात आल्या आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जे निर्णय घेतले, त्यामध्ये हा निर्णय देखील घेण्यात आला होता.
त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तृतीयपंथीय समुदायामध्ये अस्वस्थतेची बावना निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात लष्कराला आकार देणारे चार कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे, त्यामध्ये ट्रान्सजेंडर सैनिकांना अमेरिकन सैन्यात सेवा देण्यास बंदी घालणे आणि कोविड-१९ विरूद्ध लसीकरण करण्यास नकार दिल्याबद्दल काढून टाकण्यात आलेल्या सैनिकांना परत वेतन देऊन कामावर परत घेण्याच्या निर्णयांचा समावेश आहे.
ट्रम्प यांनी २०१७ मध्ये आपल्या पहिल्या कार्यकाळात देखील तृतीयपंथीयांना सैन्य दलामध्ये प्रवेश नाकारला होता. मात्र त्यांच्यानंतर अध्यक्ष झालेल्या बायडेन यांनी तो आदेश रद्द करून २०२१ मध्ये तृतीयपंथीयांना पुन्हा सैन्य दलात प्रवेश द्यायला सुरुवात केली होती.





