पुणे जिल्हा | जिरायती पट्ट्यात बाजरी पेरण्यांना वेग

काऱ्हाटी, (वार्ताहर)- बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती पट्ट्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मृग नक्षत्राच्या (बाजरी) पेरण्यांना आता वाफशानंतर वेग आला आहे.
मागील वर्षी बारामती तालुक्यात पाऊस अत्यंत कमी झाला होता. यंदा मात्र, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात मागील वर्षीच्या तुलनेत अनेक ठिकाणी पाऊस चांगला झाला आहे. काऱ्हाटी, माळवाडी, जळगाव, सायंबाचीवाडी, माळवाडी, फोंडवाडा आदी भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात चांगला पाऊस झाला आहे.
त्यामुळे या भागात बाजरीची पेरणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. काही ठिकाणी बैलांनी तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने जमिनीची मशागत सुरू आहे. वाफसा आलेल्या शिवारात पेरणी सुरू आहे. पूर्वी फक्त बैलांनीच मशागत केली जात होती.
परंतु आता बैलांपेक्षा ट्रॅक्टरचे प्रमाण अधिक दिसत आहे. बारामती तालुक्याच्या अनेक गावांत पावसाचे प्रमाण चांगले असल्याने विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा बाजरीचे पीक हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांनी लागून राहिली आहे.




