मुंबई विद्यापिठाच्या सिनेट निवडणुकीत ABVPला मोठा धक्का; युवासेनेचा 10 पैकी इतक्या जागांवर दणदणीत विजय

मुंबई – काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निकालात उद्धव ठाकरे पक्षाच्या युवासेनेचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. युवासेनेने 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला आहे. सुरुवातीला राखीव पाच जागांचे निकाल लागले. ज्यामध्ये पाचही जागांवर युवासेनेचे पाचही उमेदवार निवडून आले. त्यामुळे सिनेट निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा धक्का बसला आहे.
राखीव गटातील युवासेनेचे 5 उमेदवार विजयी ठरले. युवासेनेच्या शीतल देवरुखकर-शेठ यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून 5,498 मते खेचून आणली. तर त्यांच्या विरोधातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उमेदवार राजेंद्र सायगावकर यांना 1,014 मते पडली. तर अनुसूचित जमाती प्रवर्गात युवासेनेचे धनराज कोहचाडे यांना 5,247 मते मिळाली. तर अभाविपच्या उमेदवार निशा सावरा यांना 918 मते पडली. तसेच, युवासेनेचे मयूर पांचाळ हे ओबीसी प्रवर्गातून विजयी झाले. त्यांना 5,350 मते पडली. तर, महिला प्रवर्गातून विजयी झालेल्या स्नेहा गवळी यांना 5,914 मते पडली. तसेच, डॉ. धनराज कोहचाडे यांचा एसटी प्रवर्गातून विजय झाला असून त्यांना 5,247 मते मिळाली. तर, एनटी प्रवर्गातून शशिकांत झोरे हे विजयी झाले असून त्यांना 5,170 मते पडली.
तसेच, खुल्या वर्गातही युवसेनेने बाजी मारली असून पाच पैकी दोन जागांवर विजय मिळवला. खुल्या गटामधून युवासेनेचे प्रदीप सावंत, मिलिंद साटम आणि अल्पशे भोईर हे विजयी झाले. याशिवाय खुल्या गटामधून युवासेनेचे इतर दोन उमेदवार हे आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, सिनेट निवडणुकीमध्ये निकाल हाती येण्याच्या काही तास आधी अखिल भारतील विद्यार्थी परिषद हे युवासेनेविरोधात उच्च न्यायालयात गेले होते.
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये सिनेट निवडणुकीच्या आधी युवासेनेचे उमेदवार अल्पेश भोईर यांच्या पोलिंग एजंटमध्ये हेराफेरीचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. अल्पेश भोईर यांची मते ग्राह्य धरली जाऊ नये तसेच त्यांची सर्व मते बाद करावीत, अशी मागणी अभाविपकडून करण्यात आली.





