पुणे | अल्पवयीन मुलीवर धमकावून अत्याचार
पुणे {प्रभात वृत्तसेवा} – अल्पवयीन मुलीवर विवाहाच्या आमिषाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. मुलीला आईच्या मित्रानेच धमकावून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तसेच या घटनेची कुठेही वाच्यता न करण्याची धमकी आईने दिली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आईसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीने लोणीकंद पोलिसांत फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार आई, तसेच आईचा मित्र गोविंद काकडे (रा. वाघोली), अविनाश शेळके (रा. वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. ती एका वस्त्रदालनात कामाला आहे. आरोपी गोविंद काकडे पीडित मुलीच्या आईचा मित्र आहे.
आरोपी अविनाश शेळकेने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विवाहाच्या आमिषाने तिच्यावर बलात्कार केला. मुलीची आई घरी नसताना आरोपी काकडेने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती तिने आईला दिली. तेव्हा मुलीला मारहाण करून या घटनेची वाच्यता करू नको, तसेच पोलिसांकडे तक्रार करू नको, अशी धमकी आईने दिली. मुलीला त्रास झाल्याने तिची वैद्यकीय उपचार घेतले. तेव्हा ती गर्भवती असल्याचे समजले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला





