Pimpri | चारसूत्रीतून भरघोस भात उत्पादन

पवनानगर, – पवन मावळातील प्रयोगशील शेतकरी मिलिंद पुरंदरे यांनी जवण, अजिवली, मळवंडी ठुले, धालेवाडी, काले, महागाव व तिकोणा येथील शेत जमिनीत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करत भातशेतीतून भरघोस उत्पन्न घेतले.
कृषी विभागाच्या वतीने एकात्मिक विकास प्रकल्पाच्या माध्यमातून चारसुत्री पद्धतीने भातलागवड केली. युरिया ब्रिकेटचा वापर केला. चिखलणीच्या वेळी गिरिपुष्प पाला वापरला. त्यामुळे उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. यासाठी काले मंडल कृषी अधिकारी डोहाळे कृषी सहायकांनी वेळोवेळी मदत केल्याचे पुरंदरे यांनी सांगितले. मावळ तालुक्यातील सुवासिक तांदळला बाजारपेठेत मोठी मागणी असते. सध्या सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले तांदूळ घेण्याकडे अनेकांचा कल असतो. पवन मावळ येथील गावामध्ये असलेल्या शेतीत पुरंदरे देशी गाईंचे शेणखत, जीवामृत वापरून पिकांची जोपासना केली.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक भात उत्पादन हे मावळात होते. येथील इंद्रायणी सुवासिक तांदळाला मोठी मागणी असते. चांगला दरही मिळतो. परिसरात पर्यटनासाठी आलेले पर्यटक हा तांदूळ खरेदी करतात. आपला उद्योग सांभाळून पुरंदरे यांनी केलेली भातशेती पाहण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांनी भेट दिली. डोंगरमाथ्यावरील शेतीत एवढे चांगले उत्पादन घेतल्याने अनेक शेतकरी बांधवांनी त्यांचे कौतुक केले. परतीच्या पावसाने गेली सलग तीन वर्षे जवण येथे आंबेमोहोर भाताचे नुकसान होऊन सुद्धा या वर्षी पुन्हा आंबेमोहोर भाताची लागवड केली. त्याला फक्त स्वतः च्या गोठ्यातील देशी गाईंचे शेणखत, जीवामृत वापरून आणि पाण्याचे नियोजन, गरज पडेल तसे विहिरीचे, बोअर वेलचे पाणी वापरुन भातपीक जोपासले.
वाढती वस्ती, सुरू असलेली बांधकामे यामुळे रानडुक्कर यांचा अधिवास नष्ट झाल्याने त्यांचा वावर गावांतील, माची वरील शेतात वाढला आहे, जवण येथील शेतात देखील रानडुक्कर यांच्यामुळे भात पिकाचे नुकसान झाले आहे. आता शेतात त्याची काढणी सुरू असून त्यानंतर पारंपारिक पद्धतीने उडवी रचून कणगीत मुरवून मग त्याची भरडणी करणार आहे. इतर गावातील शेतात चारसुत्री, शेणखत वापरून इंद्रायणी भाताचे उत्पादन घेतले आहे.
– मिलिंद पुरंदरे, प्रगतशील शेतकरी.





