अबु आझमींचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन

मुंबई – सपचे आमदार अबु आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांचे अधिवेशन काळात निलंबन करावे, असा प्रस्ताव मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. अबु आझमी यांचे फक्त निलंबन करून चालणार नाही, तर त्यांचे सदस्यत्व रद्द करा, अशी सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केली.
अबु आझमी यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, अशा औरंगजेबाचे कोणीही उदात्तीकरण करू शकत नाही. त्यामुळे अबु आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केल्यामुळे त्यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात यावे, असा प्रस्ताव मांडला.
आझमी यांचे सदस्यत्व निलंबित करण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत अबु आझमी यांना कामकाजात भाग घेता येणार नाही.
दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निलंबनाचा प्रस्ताव वाचण्यास घेतला असता, विजय वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली. आझमी यांचे निलंबन व्हावे, याबद्दल कुणाचेही दुमत नाही. आम्ही त्यांचे समर्थन करत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरही कारवाई झाली पाहिजे.
मात्र, यावेळी सत्ताधारी आमदारांनी वेलमध्ये येत छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… जय भवानी जय शिवाजी… अशी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. आमदारांची घोषणाबाजी सुरू असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अबु यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात येईल, असा प्रस्ताव मंजूर केला.

