अधिवेशन संपेपर्यंत सपाचे आमदार अबू आझमी निलंबित, औरंगजेबाचे कौतुक करणं पडलं महागात

Abu Azmi suspended | समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे महागात पडले आहे. औरंगजेबाची प्रशंसा केल्याने सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आझमी यांना निलंबित करण्यात आले आहे. आझमी हे आता अधिवेशन संपेपर्यंत निलंबित असतील.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. त्यानंतर निलंबनाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. आझमींचं अधिवेशनापुरते निलंबन करण्यात आले असले तरी त्यांचे सदस्तयत्वच रद्द करण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच, भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यांकडून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे.
आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं त्याची भलामण करणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. ही त्यांची वक्तव्यं आक्षेपार्ह आहेत. त्यांची वक्तव्यं निषेधार्ह आहेत. यामुळे सभागृहाचा अपमान झाला आहे. अबू आझमींनी विधानसभेची प्रतिमा मलीन केली.’
काय म्हणाले होते अबू आझमी?
अबू आझमी यांनी औरंगजेबचे कौतुक करत त्याने मंदिरं बांधली होती असा दावा केला. ‘चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवली आहेत. तो उत्तम प्रशासक होता, त्याच्या काळात भारताची जीडीपी सर्वात जास्त होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये धर्माची लढाई नव्हती, देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं रंगवली जात आहे.’, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते.
औरंगजेबचे कौतुक केल्यानंतर त्यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नितेश राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली.





