“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, अबू आझमींकडून मुस्लिम समाजाला मोठे आवाहन

Abu Azmi on Holi – Namaz । देश आज होळीचा सण उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. दरम्यान , यंदा होळी शुक्रवारी आल्याने देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. शुक्रवारची नमाज ही मुस्लिम समाजासाठी महत्वाचे मानले जाते. त्याच पार्श्वभूमीवर कुठेही समाजविघातक घटना घडू नयेत, दोन्ही समाजातील नागरिकांनी एकोप्याने त्यांचे सण साजरे करावेत याकरता प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनीही दोन्ही समाजातील नागरिकांना आवाहन केले आहे. यासंबंधी त्यांनी आज व्हिडिओ पोस्ट करून देशातील सलोखा जपून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
होळी, नमाजसाठी एक व्हिडीओ पोस्ट Abu Azmi on Holi – Namaz ।
अबू आझमी यांनी व्हिडिओमध्ये, नमाज इस्लाममध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही नमाज मस्जिदमध्ये जाऊन अदा करा किंवा घरातही अदा केला जाऊ शकतो. पण जुम्माचा नमाज मस्जिदमध्येच अदा केला जातो, घरात नाही. १४ मार्चला रमजान आणि होळीही आहे. जे लोक वर्षभर कमीवेळा नमाज अदा करतात किंवा एकदाही करत नाहीत तेही मोठ्या प्रमाणात या दिवशी नमाज अदा करतात.” असे म्हटले आहे.
दरम्यान,पुढे बोलताना अबू आझमी यांनी, “रमजानला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी हिंदू बांधवांना विनंती करतो की तुम्ही जाणीवपूर्वक कोणावरही रंग टाकू नका. मुस्लिम बांधवांनाही माझी विनंती आहे की, त्यांचाही सण आहे, तुमच्यावर कोणी रंगा टाकला तरीही संयम बाळगा, रमजानचा महिना आहे. कोणताही वाद घालू नका. मस्जिदमध्ये जाऊन नमाज अदा करा आणि थेट घरी जा. या देशात सलोखा टिकून राहू देत. कोणतेही वाद विवाद होऊ नयेत”, असे आवाहन केले आहे.
मुंबईत पोलिसांकडून नियमावली जारी Abu Azmi on Holi – Namaz ।
दरम्यान, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, धुलीवंदनानिमित्त १२ ते १८ मार्चदरम्यान सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी गाणे, अश्लील इशारे करणे आणि रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवर रंगांनी भरलेले फुगे फेकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी जारी केलेल्या आदेशात तसे स्पष्ट करण्यात आले आहे. धुलीवंदनानिमित्त सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी, रंग फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय जातीय तणाव व सार्वजनिक शांतता भंग होईल, असे कृत्य करू नये, असेही नमुद करण्यात आले आहे.





