Crime News: ‘मोका’तील फरार आरोपी अटकेत, दोन पिस्तुले, १५ काडतुसे जप्त
Crime News: मोक्का कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक

रावेत – रावेत पोलिसांनी मोक्का कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे, एक मॅगझीन आणि क्रेटा कार असा सुमारे ११ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सराईत, फरार व आरोपींचा शोध घेण्याबरोबरच अवैध अग्निशस्त्रधारकांविरुद्ध कारवाई करण्याच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृषिकेश घाडगे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कारवाई केली.
रावेत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यात आरोपी विनोद निजप्पा गायकवाड (रा. रमाबाईनगर, रावेत) व अक्षय प्रभाकर साबळे (रा. काळभोरनगर, आकुर्डी) हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. फिर्यादीस मारहाण करून खंडणी मागितल्याप्रकरणी त्यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे यांच्या पथकाने जाधववस्ती, रावेत परिसरातून दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता दोन देशी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे व एक मॅगझीन जप्त करण्यात आले.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृषिकेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे, सहायक पोलीस फौजदार संतोष कोळगे, पोलीस हवालदार आशिष बोटके, गोविंद चव्हाण तसेच विनायक मराठे, प्रदीप गायकवाड, अजित बेंडभर, सौदागर लामतुरे, विनोद कदम, निखील कपले व लोखंडे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.





