Pune District : पुरावा नसताना खूनाचा तीन दिवसांत छडा
Pune District : पिंपळे जगताप येथील पाझर तलावामध्ये (दि.१७) रोजी एका युवकाचा मृतदेह आढळला. युवकाचा अज्ञातांनी खून केल्याचे निदर्शनास आले होते.

शिक्रापूर : पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील पाझर तलावात तीन दिवसांपूर्वी युवकाचा खून करुन फेकून दिल्याची घटना घडली होती. कोणताही पुरावा नसताना खुनातील तिघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
टूटूकुमार अजित यादव, असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पुसकरकुमार अरूण यादव (वय २०, सध्या रा. सणसवाडी, मूळ रा. बिहार), आयुषमान सुशिल पांडे (वय २० रा. सध्या रा. तळेगाव रोड शिक्रापूर, मूळ रा. बिहार), सचिन मारूती हिंगेवार (वय २०, सध्या रा. सणसवाडी, मूळ जि. नांदेड), असे जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपळे जगताप येथील पाझर तलावामध्ये (दि.१७) रोजी एका युवकाचा मृतदेह आढळला. युवकाचा अज्ञातांनी खून केल्याचे निदर्शनास आले होते.
पोलीस पाटील वर्षा योगेश थिटे यांनी फिर्याद दिली होती. मात्र, मयत युवक अज्ञात असल्याने त्याच्या कुटुंबीयांचा तसेच आरोपींचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असताना एल ॲण्ड टी फाटा परिसरात काही नागरिक एका युवकाचा शोध घेत फिरत असल्याचे पोलीस शिपाई लखन शिरसकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता खून झालेला इसम हा टूटूकुमार अजित यादव हा असल्याचे समोर आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, हनुमंतराव गिरी, पोलीस उपनिरीक्षक उमांकात कुंजीर, सोमनाथ कचरे, हवलदार नितीन सुद्रिक, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहीदास पारखे, अमोल नलगे, नवनाथ नायकडे, मिलींद देवरे, चंद्रकात काळे, संदीप कारंडे, लखन शिरसकर, मच्छिंद्र निचीत, राम जाधव, नारायण वाळके, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजु जाधव, राजु मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ, आपदा टिमचे शेरखान शेख, वैभव निकाळजे, गणेश टिळेकर, श्रीकांत भाडळे, महेश साबळे, राहुल गायकवाड, अमोल नप्ते, रोहित थोरात यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले हे करीत आहेत.
प्रेमसंबंध, शेतीच्या वादाची किनार
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून तपास सुरु केला असता पोलिसांना पूसकरकुमार यादव याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने टूटूकुमार याने बिहारमधील मूळ गावी शेतात चोरी केल्याच्या संशयातून तसेच टूटूकुमारच्या मित्राचे आपल्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असताना टूटूकुमार त्याला मदत करीत असल्याच्या संशयातून खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी गावाकडील वादातून टूटूकुमार याचा गळा आवळून तसेच बिअरची बाटली फोडून गळ्यात भोकसून खून केल्याचे कबुल केले.





