अबाऊट टर्न : नकली बटाटा

– हिमांशू
कॉर्पोरेट क्षेत्रानं दिलेला ‘मल्टीटास्किंग’ हा शब्द सध्या चांगलाच रुळलाय. शब्द फार जुना नसला, तरी त्याला अभिप्रेत असलेली प्रक्रिया खूप जुनी आहे. अर्थशास्त्रात सांगितलेल्या श्रमविभागणीच्या तत्त्वाच्या अगदी उलट असा हा नवा सिद्धान्त.
एकाच व्यक्तीने अनेकविध कामं तितक्याच कुशलतेने करणं, असा त्याचा साधासरळ अर्थ. वास्तविक, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वोत्तम ‘मल्टीटास्किंग’ केलं होतं. शिवारात नांगर चालवणारा शेतकरी युद्धाच्या वेळी हातात तलवार घेऊन रणांगणात उतरत असे. आजही शेतकरी नांगरणीपासून पिकाच्या कापणीपर्यंत सगळी कामं स्वतःच करतो. सर्वसामान्य गृहिणीसुद्धा गरजेप्रमाणं ‘मल्टीटास्किंग’ करतच असते.
स्वयंपाकघरात तिच्या मदतीला धावून येणारा ‘मल्टीटास्कर’ म्हणजे बटाटा! बटाट्याची भाजी अनेक प्रकारे करता येते. उपवासाला बटाटा चालतो. बटाटामिश्रित खिचडी आणि भाजीबरोबरच चिप्स आणि चिवडाही उपवासाला चवीने खाल्ला जातो. ऐनवेळी पाहुणे आले आणि भाजी कमी असेल तर इतर कोणत्याही भाजीत ‘भर’ म्हणून बटाटा उपयोगी पडतो. बिचारा कुठल्याही भाजीसोबत कुरकूर न करता शिजतो.
हॉटेलात गेलं तर मेनूकार्डमध्ये एकट्या पंजाबी रेसिपीजमध्ये दम आलू, आलू मटर, अलू गोभी, आलू करी, आलू पराठे असे असंख्य पदार्थ दिसतात. मंडईत इतर भाज्या आवडीनुसार निवडल्या जात असल्या तरी बटाटे घेतल्याशिवाय कुणी घरी येत नाही. बटाटा घेताना ङ्गार चिकित्सा केली जात नाही; पण आता ती करावी लागणारआहे.
बाजारात बटाटासुद्धा बनावट येऊ लागला, तर निर्धास्तपणे खरेदी करण्याजोगं उरलंच काय? उत्तर प्रदेशतल्या बलियामध्ये पांढर्या बटाट्यावर लाल रंग चढवून जास्त भावाने विकला जात असल्याचं उघड झालं आणि अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण हा बनावट बटाटा आणि त्यावर चढवलेला रसायनयुक्त रंग यामुळं आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो, असं सांगितलं गेलंय.
प्रसंगी एखाद्याला या बटाट्यामुळं कर्करोगही होऊ शकतो. अन्नसुरक्षा आणि औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात असे 21 क्विंटल बटाटे जप्त करण्यात आले. ही बनावटगिरी आता सगळीकडेच बोकाळली आहे. आपण पितो ते दूध सुरक्षित आहे की नाही, हे आपल्याला कळत नाही. धान्यांपासून तेलापर्यंत आणि औषधांपासून ङ्गळांपर्यंत बरंच काही बनावट, कृत्रिम आलंय.
वेगवेगळ्या फवारण्या करून फळं, भाज्या पिकवणं, सुकलेल्या टवटवीत करणं एवढंच नव्हे तर फळांचा आकार निर्धारित करण्यासाठीही फवारण्या चालल्यात. मंडईत हस्तिदंताएवढा मुळा दिसू लागलाय, जो तिखटच लागत नाही. कोवळ्या काकडीसारखा खाता येतो. केळी तुकतुकीत दिसतात; पण ती नैसर्गिकरीत्या पिकली असतील, याची शाश्वती नाही. या यादीत आता ‘मल्टीटास्कर’ बटाटाही दाखल झालाय.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बटाटा घेताना तो लालसर दिसल्यास त्यावर अंगठा घासून पाहावा. कृत्रिम, अनैसर्गिक रंगाचा वापर केला असेल, तर तो रंग हाताला लागतो. याही चाचणीत काही समजलं नाही, तर घरी आणल्याबरोबर बटाटा पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवावा. त्यानंतर हातानं घासून पाहिल्यास रंग बदलतो. बनावट बटाटा खाल्यास उलट्या, जुलाब, छातीत आणि पोटात जळजळ, तहान, अशक्तपणा अशी लक्षणं जाणवतात. दीर्घकाळ खाल्ल्यास मूत्राशयाचा किंवा फुफुसाचा कर्करोगही होऊ शकतो. किती सहज आणि सार्वत्रिक झालंय जिवाशी खेळणं..!





