आपल्याकडे तंबाखूला व्यसन म्हणून बघितलं जात नाही, त्यामुळे याचा सर्रास वापर होताना दिसतो. पुरुषांमध्ये तंबाखू व महिलांमध्ये मिश्रीच्या व्यसनाचे प्रमाण जास्त आहे. कमी वयातच मिश्रीची सवय लागते. बरेच वेळा एकमेकींच्या सांगण्यावरून मिश्री घासायला सुरुवात होते. काही महिलांच्या बाबतीत याची सुरुवात लग्नानंतर झालेली बघायला मिळते. मिश्री घासण्याची सुरुवात कधी तरी किंवा दिवसातून एकदा किंवा दोनदा घासण्यापासून होते. आणि हळूहळू त्याचे प्रमाण वाढायला लागते.
खूप कामे करायची असतील, जास्त वेळ काम करायचे असेल, कोणते टेन्शन असेल तर मिश्री घासण्याचे प्रमाण वाढते. महिलांशी बोलल्यानंतर त्या असं सांगतात की मिश्री घासली की बरे वाटते, तरतरी येते, काम पटपट उरकतात, विचार कमी होतात, त्यामुळे बरेच वेळा मिश्री घासण्याचे प्रमाण वाढते. आता आपण मिश्रीविषयीची थोडी शास्त्रीय माहिती जाणून घेऊया. मिश्री तंबाखूपासून बनविली जाते. तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे द्रव्य असते. यामुळे मिश्रीचे सेवन केल्यानंतर तात्पुरता उत्साह आल्यासारखा वाटतो. आपल्या तोंडामध्ये खूप लहान लहान नसा असतात. त्यामुळे मिश्रीचे बोट तोंडात घातल्या घातल्या त्यामधील निकोटीन रक्तामध्ये शोषले जाते. याउलट आपण जेवण केल्यानंतर त्याचे पचन होऊन रक्तात रूपांतर व्हायला साधारणतः दोन तास लागतात.
पण मिश्रीमध्ये निकोटीन नावाचे रसायन असते जे लगेच रक्तात मिसळते व त्यामुळे मेंदूला जी किक बसते, नशा येते त्याची सवय लागते. परत परत मिश्री घासण्याची इच्छा होते. मिश्रीमुळे तोंडामध्ये असणाऱ्या लाळ तयार करणाऱ्या ग्रंथींवर परिणाम होतो व हळूहळू लाळ तयार व्हायचे प्रमाण कमी होते. सतत मिसरी घासल्यामुळे लाळ तोंडातून बाहेर टाकली जाते. ही लाळ पचनशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची असते.
ही लाळ पोटात न गेल्यामुळे बरेच वेळा अपचन, पित्त याचा त्रास व्हायला लागतो.तरुण वयामध्ये ताकद असते तेव्हा काही त्रास जाणवत नाही किंवा जाणवला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु, वय वाढेल तसे मिश्रीमुळे होणारे त्रास दिसायला लागतात. बऱ्याच महिलांमध्ये कंबर, गुडघे, पाठ दुखणे सुरू होते. दातांचे आरोग्य बिघडते, भूक कमी होते. शरीरातील हिमोग्लोबिन म्हणजेच रक्ताचे प्रमाण कमी होते. यासोबतच कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. मिश्रीचे सेवन करण्यासाठी पैसा खर्च होतो. त्यामुळे आर्थिक परिस्थितीवर थोडा तरी परिणाम होतो.
========================