वेषांतर करुन दिल्लीला गेल्याबाबत अजित पवार म्हणाले,’मी कधीही लपून छपून राजकारण केलं..’

Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार दिल्ली दौऱ्यामुळे चर्चेत आहे. भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी अजित पवार आणि अमित शाह यांच्यात दिल्लीत अनेकदा बैठका झाल्या आहे. अजित पवार यांनी नुकतेच सांगितले की,’मी मास्क आणि टोपी घालून विमानाने दिल्लीला जात होतो.’ यानंतर या विधानावरून राजकारण तापले असून शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना घेरले गेले.
विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर आता अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आपण वेषांतर करुन दिल्लीला गेल्याच्या बातम्या खोट्या आहेत. ते सिद्ध झाले तर राजकारण सोडू, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
Ajit Pawar । नेमकं काय म्हणाले अजित पवार…
‘मी कधीही लपून छपून राजकारण केलं नाही मला तशी सवय नाही. परंतु वेगवेगळ्या बातम्या पेरुन आमची बदनामी केली जात आहे. माझ्याबाबत फेक नॅरेटीव्ह तयार केले जात आहे. आमच्या चांगल्या योजना येत असल्याने विरोधक हादरले. त्यामुळे त्यांनी असे उद्योग चालवले आहे. मी वेशभूषा बदलून दिल्लीला गेलो हे साफ खोटे आहे. मला कुठे जायचे असेल उघडपणे जाईल. मला घाबरण्याची गरज नाही. वेषांतराचा आरोप खरे ठरले तर राजकारण सोडून देईल.’
अजित पवार पुढे म्हणाले,’माझी बदनामी करण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. राज्यात वाचाळवीरांची संख्याही वाढली आहे. सकाळचा जो भोंगा असतो त्याच्याकडून उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार होत असतो, असा हल्ला संजय राऊत यांचे नाव न घेता अजित पवार यांनी केला. ज्यावेळी हा प्रकार घडला तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो. समाजातील सर्वच लोक मला ओळखतात. त्यामुळे असे घडणे अशक्य आहे. सध्या हे जे चालले आहे ते सर्व चुकीचे आहे. त्या बातम्यांना काहीच आधार नाही. कुठलाई पुरावा नाही.असेही पवार यांनी म्हटले आहे.





