पुणे | वाहनचालकांवरील जाचक दंड रद्द करा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे शहरात वाहनचालकांवर सीसीटिव्हीच्या माध्यमातून ठोठावण्यात येत असलेला जाचक दंड आणि खटले तातडीने मागे घ्या, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
शहरात गेल्या काही दिवसांपासून सीसीटिव्हीच्या माध्यमातून ऑनलाइन दंड वाहनचालकांना लावला जात आहे. हा दंड नेमका कशासाठी लावला, याचे कारण वाहनचालकांना कुठल्याही पद्धतीने सांगितले जात नाही. तातडीने दंड भरा, असे एसएमएस मात्र वाहनचालकांना सातत्याने येत आहेत. नोटिसाही पाठवल्या जात आहेत. याकडे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
जनता महागाईने त्रस्त आहे. पेट्रोल, डिझेल, तसेच गॅसच्या भाववाढीला लोक कंटाळले आहेत. अशा स्थितीत वाहन चालकांकडून नाहक दंड आकारला जात आहे.
पोलिसांकडून वाहनधारकांची वाहने अडून प्रलंबित दंड भरा, अशी सक्ती होत आहे. आर्थिक परिस्थिती नसताना अनेक वाहनचालकांना हा दंड भरावा लागत आहे. त्या मुळे पुणेकर नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा दंड आणि खटले रद्द करावेत, असे धंगेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.





