Abhishek Sharma : जर्सी बदलली तरी बदललं नाही नशीब! अभिषेक शर्माने टी-२० वर्ल्ड कपमध्ये नोंदवला सर्वात लाजिरवाणा विक्रम
Abhishek Sharma : अभिषेक शर्माने सलग तिसऱ्या सामन्यात 'डक' (शून्य) वर बाद होऊन भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका नकोशा विक्रमाची नोंद केली आहे

Abhishek Sharma unwanted record in T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ च्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध खेळताना अभिषेकने चाहत्यांची मोठी निराशा केली आहे. सलग तिसऱ्या सामन्यात ‘डक’ (शून्य) वर बाद होऊन त्याने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका नकोशा विक्रमाची नोंद केली आहे.
शून्याची ‘हॅट्ट्रिक’ आणि लाजिरवाणा विक्रम –
कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर अभिषेक शर्मा मैदानात उतरला. मात्र, केवळ तीन चेंडू खेळल्यानंतर आर्यन दत्तच्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. यासह अभिषेक शर्मा टी-२० विश्वचषकाच्या एकाच हंगामात तीन वेळा शून्यावर बाद होणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताचा कोणताही खेळाडू एकाच वर्ल्ड कपमध्ये तीन वेळा शून्यावर बाद झाला नव्हता.
नेहरा आणि सुंदर यांच्या विक्रमाची बरोबरी –
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक वेळा (एकूण ३ वेळा) शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत अभिषेकने माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराची बरोबरी केली आहे. त्याचबरोबर टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणारा तो वॉशिंग्टन सुंदरनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच एकाच विश्वचषकात ३ वेळा डकवर बाद होणाऱ्या आंद्रे फ्लेचर, रिची बेरिंग्टन आणि तांझिद हसन यांसारख्या खेळाडूंच्या नकोशा यादीत आता अभिषेकचा समावेश झाला आहे.
Duck vs USA
Duck vs PAK
Duck vs NEDThe No.1 T20I batter, Abhishek Sharma, is yet to open his account in T20 World Cup 2026.
📸: JioStar | #T20WorldCup2027 #INDvNED #AbhishekSharma pic.twitter.com/2JxvbQ2A6Y
— CricTracker (@Cricketracker) February 18, 2026
टी-२० विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक डक होणारे खेळाडू:
- आंद्रे फ्लेचर (वेस्ट इंडिज) – तीनदा (२००९)
- रिची बेरिंग्टन (स्कॉटलंड) – तीनदा (२०२१)
- रेगिस चाकाब्वा (झिम्बाब्वे) – तीनदा (२०२२)
- रॉजर मुस्का (युगांडा) – तीनदा (२०२४)
- तन्जिद हसन (बांगलादेश) – तीनदा (२०२४)
- अभिषेक शर्मा (भारत) – तीनदा (२०२६)
सिराजची जर्सी अनलकी ठरली?
या सामन्यात अभिषेक शर्माने एक वेगळा प्रयोग केला होता. तो स्वतःच्या जर्सीऐवजी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या नावाची जर्सी घालून फलंदाजीला आला होता. क्रिकेटमध्ये अनेकदा नशिबासाठी असे ‘युक्त्या’ केल्या जातात, मात्र अभिषेकचा हा प्रयोग सपशेल फसला. गेल्या ७ डावांचा विचार केल्यास अभिषेक पाच वेळा शून्यावर बाद झाला आहे, जे त्याच्या फॉर्मबद्दल चिंता निर्माण करणारे आहे.






