IND vs ENG: दुसऱ्या टी20 सामन्याआधी भारतीय संघाची चिंता वाढली, तुफान फटकेबाजी करणाऱ्या ‘या’ खेळाडूला दुखापत

India vs England 2nd T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा टी-20 सामना आज चैन्नई येथे खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 विकेट्स राखून पराभव करत मालिकेत आघाडी घेतली होती. या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माने 79 धावांची वादळी खेळी केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्याआधी अभिषेकला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
दुसऱ्या सामन्याआधी सराव करताना अभिषेकला दुखापत झाली. मैदानावर सराव करताना त्याचा पाय मुरगळला व यानंतर त्याला मैदानातून बाहेर जावे लागले. त्यामुळे आजच्या सामन्यात अभिषेक खेळणार की नाही? याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
पहिल्या टी-20 सामन्यात भारताच्या विजयात अभिषेकचा महत्त्वाचा वाटा होता. त्याने 34 बॉलमध्ये 79 धावांची तुफानी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात अभिषेक न खेळल्यास भारतासाठी हा चिंतेचा विषय ठरू शकतो. अभिषेक सामन्यात न खेळल्यास त्याच्याजागी सलामीला कोण येणार याचा विचार कर्णधार सूर्यकुमार यादव व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना करावा लागणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी केवळ संजू सॅमसंग आणि अभिषेक शर्मा या दोनच स्पेशलिस्ट सलामीवीरची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे अभिषेक मैदानात न उतरल्यास त्याजागी कोण खेळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अभिषेकच्याजागी ध्रुव जुरेलला अंतिम 11 खेळाडूमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच, पहिल्या सामन्यात भारतीय संघात 3 फिरकीपटूंना स्थान मिळाले होते. त्यामुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आजच्या सामन्यासाठी संघात स्थान मिळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





