Abhishek Banerjee : लोकसभेतील आठ विरोधी खासदारांचे निलंबन मागे घ्यावे, यासाठी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी सोमवारी दिली. संसद सुरळीत चालावी, अशी आमची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संसद संकुलात पत्रकारांशी बोलताना अभिषेक म्हणाले की, आम्हाला सभागृह चालावे असे वाटते. सभागृह चालवण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि विरोधकांनाही बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. आठ खासदारांच्या निलंबनाचा आढावा घेऊन संसदेत लोकशाही संतुलन राखण्यासाठी सभापतींसमोर औपचारिक अपील दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देणार का, या प्रश्नावर बॅनर्जी यांनी थेट उत्तर टाळत, या विषयावर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे नमूद केले. तृणमूलने एका निवेदनात म्हटले आहे की, निवडून आलेल्या विरोधी खासदारांना बोलण्याची संधी देणे आवश्यक आहे, कारण ते लाखो नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. मनमानी निलंबनाने त्यांचा आवाज दाबता येणार नाही. प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी आवाज दडपण्याचा सरकारचा कल लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. राहुल गांधींना बोलण्याची परवानगी देण्याच्या मागणीवरून गोंधळ झाल्याने सोमवारी लोकसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.