‘महात्मा गांधींनी पाकिस्तानची निर्मिती केली…’, ‘या’ प्रसिद्ध गायकाचे वादग्रस्त वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Bhattacharya on mahatma gandhi | आपल्या गाण्यांसोबतच स्पष्टवक्तेपणासाठी चर्चेत असलेले गायक अभिजीत भट्टाचार्य पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यावेळी त्यांनी महात्मा गांधींविषयी वादग्रस्त विधान केले असून, यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
एएनआयच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अभिजीत भट्टाचार्य यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच बॉलिवूडमधील अनुभवांवरही भाष्य केलं. मात्र चर्चेच्या दरम्यान महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. त्यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानण्यास नकार तर दिलाच, सोबतच गांधींनीच पाकिस्तानची निर्मिती केली, असे वक्तव्य केले आहे.
“गांधी जी ने बनाया पाकिस्तान…” Abhijeet Bhattacharya’s controversial statement#SmitaPrakash #ANIPodcast #AbhijeetBhattacharya #MahatmaGandhi #Pakistan
Watch full episode here: https://t.co/hK6KNZV8wF pic.twitter.com/JJ20Ua5Hk4
— ANI (@ANI) April 11, 2025
भट्टाचार्य म्हणाले, “तुम्ही गांधीजींना राष्ट्रपिता म्हणता, पण आम्ही कोणालाही ‘वडील’ का मानावं? त्यांनी एक राष्ट्र तयार केलं आणि ते होतं पाकिस्तान. भारत तर आधीच अस्तित्वात होता.”
त्यांनी पुढे इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की “इंदिरा गांधींनी बांगलादेश बनवलं, त्यामुळे मी त्यांना गांधींपेक्षा जास्त मान देतो.”
या मुलाखतीतील एक व्हिडीओ एएनआयने आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवर शेअर केला असून त्यात ते गांधीजींच्या अहिंसेच्या विचारावरही प्रश्न उपस्थित करताना दिसतात. मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, “आपल्याला शिकवलं गेलं की, एक गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा. पण मी म्हणतो, कुणी का मारावे? तू आधी त्याच्या दोन कानाखाली मार. ही शिकवण चुकीची होती.”
अभिजीत यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गांधींजीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होत आहे.





