अब्दुल सत्तार यांचा आदित्य ठाकरेंना टोला : म्हणाले,“छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय, ते…”

मुंबई : राज्यातील टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने राजकीय वर्तुळातुन राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे सरकारवर “खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही”, अशी टीका केली होती. या टीकेला आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ असा केला आहे.
टाटा एअरबस निर्मिती प्रकल्प गुजरातला होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली. दरम्यान, यावर बोलताना अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा ‘छोटा पप्पू’ असा उल्लेख करत प्रत्युत्तर दिले आहे. “खरंतर मला आश्चर्य वाटतंय आदित्य ठाकरेंचं. तो प्रकल्प कधी गेला? कसा गेला? कोणती तारीख होती? हे जर बारकाईनं त्यांनी पाहिलं तर त्यांच्या सगळं लक्षात येईल. २१ सप्टेंबर २०२१ ला हा प्रकल्प गुजरातला गेला. तेव्हा कोण मुख्यमंत्री होते? त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. जे बोलत आहेत, ते तेव्हा कॅबिनेट मंत्री होते”, असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
“या व्यवहारात त्यांच्याशी देवाण-घेवाण बरोबर झाली नाही का? यावरही लोक प्रश्न विचारू लागले आहेत. छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय, ते जर आधी बोलले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती”, अशा शब्दांत सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी “टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण, पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.





