अबब! हरियाणाचे ९६ टक्के आमदार कोट्याधीश, डोळे विस्फारणारी माहिती आली समोर…

हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीनंतर करण्यात आलेल्या ADR आणि हरियाणा इलेक्शन वॉचच्या अहवालातून महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार हरियाणातील, ९० आमदारांपैकी ९६ टक्के म्हणजेच ८६ आमदार कोट्याधीश आहेत, तर १३ टक्के म्हणजेच १२ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.
२०१९ मध्ये कोट्याधीश आमदारांची संख्या ९३ टक्के होती, ती आता ९६ टक्क्यांवर पोहोचली आहे. विजेत्या उमेदवारांपैकी ४४ टक्के लोकप्रतिनिधींकडे १० कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता आहे, तर केवळ २.२ टक्क्यांकडे २० लाख रुपयांपेक्षा कमी संपत्ती आहे.
हिसारमधील अपक्ष आमदार सवित्री जिंदल यांनी या यादीत अव्वल क्रमांक पटकावत त्या सर्वात श्रीमंत आमदार ठरल्या आहेत. त्यांच्याकडे २७० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजपच्या शक्ती राणी शर्मा (१४५ कोटी) आणि श्रुती चौधरी (१३४ कोटी) या अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
निवडणुकीत विजय मिळवलेल्या ३० आमदारांच्या संपत्तीमध्ये मागील टर्मपेक्षा सरासरी ५९ टक्के इतकी दणदणीत वाढ झाली आहे. याचाच अर्थ असा की, २०१९ मध्ये ९.०८ कोटी संपत्ती असलेल्या आमदाराच्या संपत्तीने वाढून १४.४६ कोटींपर्यंत झेप घेतली आहे.
निवडणुकीत विजयी झालेल्या १२ उमेदवारांनी आपल्यावर गुन्हे असल्याची माहिती दिली आहे, त्यापैकी ६ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका उमेदवारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. २०१९ मध्ये सात उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल होते.
पक्षनिहाय पाहिल्यास काँग्रेसचे १९ टक्के, भाजपचे ६ टक्के, तर अपक्षांपैकी ६७ टक्के आमदारांनी आपल्यावर गुन्हे असल्याचे जाहीर केले आहे.
विजेत्यांपैकी २८ जणांकडे १ कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज असल्याचे उघड झाले आहे. काँग्रेसचे राजबीर फर्तिया यांनी सर्वाधिक ४४ कोटी रुपयांच्या कर्जाची माहिती दिली आहे, त्याचबरोबर २०२३-२४ या वर्षातील उत्पन्नात त्यांचे उत्पन्न १०.७५ कोटी असल्याचे नमूद केले आहे.
शैक्षणिक पार्श्वभूमीच्या दृष्टीने, ६८ टक्के विजेते उमेदवार पदवीधर किंवा त्याहून अधिक शिकलेले आहेत, तर २९ टक्के उमेदवार आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. नव्या विधानसभेत १४ टक्के महिला आमदार निवडून आल्या आहेत, ही संख्या २०१९ च्या १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच, ५१ ते ८० वयोगटातील ६६ टक्के आमदार नवनिर्वाचित सभागृहात आहेत.
निवडणूक निकालांनंतर, हरियाणातील सत्ताधारी भाजपने तिसऱ्यांदा सलग विजय मिळवून काँग्रेसच्या पुनरागमनाच्या आशा धुळीस मिळवल्या. भाजपने सर्वोत्तम कामगिरी करत ४८ जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसला ३ ७ जागांवर यश मिळाले.





