अबब…81 लाख पीडीएफ पुस्तके डाऊनलोड

बालभारतीच्या वेबसाइटवर भरघोस प्रतिसाद
पुणे – लॉकडाऊन कालावधीत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाइन पीडीएफ पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत तब्बल 81 लाख पीडीएफ पुस्तके डाऊनलोड करण्यात आल्या आहेत.
बालभारतीकडून खासगी व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता पाठ्यपुस्तके खुल्या बाजारातून पुस्तक विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात. यंदा लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांचा प्रश्न पडला होता. ऑनलाइन पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणीही बालभारतीकडे करण्यात आली होती. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांची पीडीएफ फाइल बालभारतीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आजपर्यंत इयत्ता बारावीच्या 20 लाख 54 हजार 194 आणि इयत्ता पहिली ते अकरावीच्या 61 लाख 20 हजार 753 पीडीएफ फाइल डाऊनलोड केलेल्या आहेत. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांची मागणी होत असल्याने दहावीच्या पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात बालभारतीच्या भांडारात पाठ्यपुस्तक खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून नोंदणीकृत असलेल्या पाठ्यपुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांकरिता पुस्तकांच्या ऑनलाइन मागणीसाठी यंत्रणा विकसित केली असून त्याचे प्रात्यक्षिक शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दाखविण्यात आले आहे.
विक्रेत्यांसाठी ऑनलाइन नोंदणी सुविधा
पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांना भांडारात न येता ऑनलाइन पद्धतीने 24 तासांत केव्हाही पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे. त्यासाठी त्यांना कायमस्वरूपी युजर आयडी व पासवर्ड देण्यात येत असून त्याचा वापर करून पुस्तक विक्रेत्यांना संकेतस्थळावर पाठ्यपुस्तकांची ऑनलाइन मागणी नोंदविता येणार आहे. पैसेही ऑनलाइन भरता येणार आहेत. याच सेवेमार्फत पुस्तक विक्रेत्यांना एसएमएस पाठविण्यात येऊन पुस्तके ताब्यात घेण्याबाबत सूचना प्राप्त होणार आहेत.





