Virat vs Sachin : “सचिनपेक्षा विराट कोहलीच सरस!”; एबी डिव्हिलियर्सच्या विधानाने खळबळ, आकडेवारीमुळे सोशल मीडियावर जुंपली
Virat vs Sachin : परदेशी मैदानांवर विराट कोहली अधिक श्रेष्ठ फलंदाज ठरतो, असा खळबळजनक दावा दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने केला आहे.

AB de Villiers Claims Virat Kohli Better Than Sachin Tendulkar In Away Test Matches : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात १५,९२१ धावा आणि ५१ शतकांचा विश्वविक्रम नावावर असणाऱ्या ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरपेक्षाही (Sachin Tendulkar) परदेशी मैदानांवर विराट कोहली (Virat Kohli) अधिक श्रेष्ठ फलंदाज ठरतो, असा खळबळजनक दावा दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) केला आहे. सचिनने परदेशात जाऊन आक्रमक खेळण्याचा पाया रचला असला, तरी विराटने त्या परंपरेला पुढच्या सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवले, असे मत डिव्हिलियर्सने आपल्या यूट्यूब चॅनेलवर व्यक्त केले आहे.
‘सचिनने सुरुवात केली, पण विराटने लेव्हल वाढवली!’; काय म्हणाला डिव्हिलियर्स?
डिव्हिलियर्स म्हणाला, “आशियाई फलंदाज उसळत्या आणि वेगवान खेळपट्ट्यांवरही वर्चस्व गाजवू शकतात, हे सर्वात आधी सचिन तेंडुलकरने दाखवून दिले. मात्र, विराट कोहली सचिनपेक्षाही अधिक आक्रमक आणि कणखर फलंदाज ठरला. सचिनने सुरू केलेला ट्रेंड विराटने पुढे नेत नव्या उंचीवर पोहोचवला.” डिव्हिलियर्सच्या मते, याच वारशामुळे आज केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कलसारखे युवा फलंदाज परदेशी मैदानांवर निडरपणे फलंदाजी करत आहेत.
आकडेवारी काय सांगते? सचिन तेंडुलकर अजूनही पुढे!
🚨Virat Kohli was better than Sachin Tendulkar in Tests – AB De Villiers makes massive claim🤯
AB De Villiers said :🗣️
“I think of someone like Sachin Tendulkar way back, who started that trend for India. Yet, he wasn’t as strong as someone like Virat Kohli, who was even… pic.twitter.com/oNmx4Rl3WE
— Akshat (@Cricketmythos) August 20, 2026
डिव्हिलियर्सने कोहलीचे कौतुक केले असले तरी प्रत्यक्षात आकडेवारी मात्र सचिनच्या बाजूने झुकलेली दिसते. सचिनने कसोटीत भारताबाहेर तब्बल ८,७०५ धावा (एकूण धावांच्या ५५%) केल्या आहेत, जे परदेशी कसोटीतील सर्वोच्च आहेत. तर मे २०२५ मध्ये कसोटीतून निवृत्त झालेल्या कोहलीने भारताबाहेर ६६ कसोटीत ४,७७४ धावा केल्या आहेत. एकूण कसोटी कारकिर्दीत सचिनच्या नावावर २०० सामन्यांत १५,९२१ धावा आहेत, तर कोहलीने १२३ कसोटींत ९,२३० धावा केल्या आहेत.
SENA देशांतील कामगिरीतही ‘मास्टर ब्लास्टर’ अव्वल!
दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (SENA) या आव्हानात्मक देशांमध्येही सचिनची सरासरी सरस आहे. सचिनने या देशांत ६३ कसोटींमध्ये ५१.३० च्या सरासरीने ५,३८७ धावा कुटल्या, ज्यात १७ शतके आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर कोहलीने सेना देशांत ४६ कसोटींमध्ये ४२.०८ च्या सरासरीने ३,६६१ धावा केल्या असून यात १२ शतके व १४ अर्धशतके आहेत. असे असले तरी कोहलीच्या आक्रमक नेतृत्वात आणि फलंदाजीत भारताने परदेशात जिंकण्याची सवय लावून घेतल्याचे डिव्हिलियर्सने अधोरेखित केले.





