सलग दुसऱ्या वर्षी ‘आरतीचा मान’ आयुक्तांना; मानाचा पहिला कसबा गणपतीची पूजा करणार

पुणे – ऐतिहासीक वैभवशाली परंपरा असलेल्या असलेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा मान सलग दुसऱ्या वर्षी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना मिळणार आहे. दरवर्षी शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या हस्ते मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या पूजेने मिरवणुकीची सुरूवात केली जाते. मात्र, महापालिकेच्या निवडणुका लांबल्याने शहराची जबाबदारी प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कुमार यांच्याकडे असल्याने त्यांना सलग दुसऱ्या वर्षी महापालिका आयुक्तांना हा मान मिळणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सकाळी 09:30 वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक आणि लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्तांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून त्यानंतर सकाळी 10:00 वाजता या मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. या वेळी विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त तसेच पालकमंत्री यांच्यासह वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच शहरातील आमदार आणि माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
मेट्रोच्या कामामुळे कोंडी…
ज्या ठिकाणी मिरवणुकीला सुरूवात होते. त्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. या शिवाय पाऊस असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी पाणीही साचत आहे. त्यामुळे मिरवणुकीच्या ठिकाणी पाणी साचणार नाही तसेच गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनास मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, मिरवणूक मार्गावर तसेच महात्मा फुले मंडईच्या परिसरात महापालिकेकडून स्वच्छता तसेच दुरूस्तीची कामे करण्यात आली असून सकाळी 08:00 पासूनच या ठिकाणी जाणारे रस्ते बंद केले जाणार आहे.





