वॉशिंग्टन – जगबुडी, जगाचा विनाश किंवा प्रलय (World End) या संकल्पना गेल्या शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक वेळा समोर आल्या आहेत. 2000 मध्ये नव्या शतकाला सुरुवात होत असताना जगबुडी होईल अशा प्रकारची भविष्यवाणी सुद्धा वर्तवण्यात आली होती. विविध संस्कृतीमध्ये प्रलयाबाबत असे विविध सिद्धांत मांडले जात असतात. आता अमेरिकेतील एक तरुण गेल्या पंधरा वर्षापासून अशा प्रलयाची प्रतीक्षा करत असून या प्रलयाला सामोरे जाण्याची तयारी व्हावी म्हणून तो या संपूर्ण कालावधीमध्ये जगापासून दूर राहात आहे. (Aaron Fletcher)
ओरेगॉनमधील या तरुणाचे नाव एरोन फ्लेचर असे असून पंधरा वर्षापासूनच घर सोडून स्वतंत्र जगण्याचा निर्णय त्याने घेतला. लवकरच होणाऱ्या प्रलयाला सामोरे जायचे असेल तर सर्वच लोकांनी अशा अशा मानसिकतेची तयारी ठेवायला हवी असे त्याचे म्हणणे आहे. एरोन सध्या छोट्या व्हॅनमध्येच राहात असून तो एका ठिकाणी कधीच राहत नाही. दरवेळी त्याचा मुक्काम बदलत असतो.
आधुनिक जीवनशैली पासून आणि आधुनिक जगातील व्यवहारांपासून शक्यतो दूर राहण्याचा त्याचा प्रयत्न असतो. फक्त गरजा पूर्ण करण्यापुरताच तो जगाशी संपर्क ठेवतो, नंतर पुन्हा एकदा आपल्या व्यवहारांमध्ये मग्न होतो. जगबुडी होण्याची किंवा प्रलय होण्याची वेळ केव्हाच टळून गेली आहे. यापूर्वीच प्रलय येण्याची गरज होती असे त्याचे म्हणणे आहे.
काही कारणांनी जरी प्रलय पुढे गेला असला तरी मानव जातीने ह्या संकटासाठी तयार राहायला हवे त्यासाठी कमीत कमी गरजांच्या माध्यमातून जगण्याची सवय लावून घ्यायला हवी असे त्याचे म्हणणे आहे. लवकरच येणाऱ्या या प्रलयामधून जर मानवजातीला वाचायचे असेल तर त्यांनीही वेगळ्या प्रकारची जीवनशैली विकसित करायला हवी असे त्याचे म्हणणे आहे. सर्वसाधारणपणे प्रलयाच्या संकल्पनेमध्ये संपूर्ण जगाचा नाश होत असला तरी फ्लेचरच्या मते या येणाऱ्या जगबुडीनंतर मानवजातीचे अस्तित्व कायम राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.