चंदिगढ : पंजाबमधील सत्तारूढ आपने त्या राज्यात नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती केली. आता ती जबाबदारी राज्याचे मंत्री अमन अरोरा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यातून पक्षाने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावरील भार कमी केल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी भूमिका मान सांभाळत होते. त्यांनी तब्बल ७ वर्षे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्य केले. त्यांच्याकडे खासदार असताना २०१७ मध्ये ती जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली आपने पंजाबमध्ये २०१९ आणि २०२४ मधील लोकसभा निवडणुका लढवल्या. त्यांच्याच नेतृत्वाखाली आपने २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत बाजी मारून पंजाबची सत्ता काबीज केली. मान यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्यानंतरही प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली. मात्र, महिनाभरापूर्वी त्यांनी स्वत:हून प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री या नात्याने मला मोठी जबाबदारी सांभाळावी लागते. त्यामुळे पूर्णवेळ प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करण्याची विनंती मी आप नेतृत्वाला करणार आहे, असे त्यांनी म्हटले. आता मान यांच्या इच्छेनुसार आपने अरोरा यांच्याकडे प्रदेश शाखेची धुरा सोपवली आहे. त्यांच्या मदतीला आमदार अमनशेर सिंग यांना कार्याध्यक्ष बनवण्यात आले आहे.