नवी दिल्ली – आप ने दिल्लीची 12 झोनमध्ये विभागणी केली आहे आणि प्रत्येकी तीन झोनची जबाबदारी चार वरिष्ठ नेत्यांना दिली आहे, जे त्यांच्या झोनच्या नगरसेवकांशी समन्वय साधतील, बैठका घेतील आणि त्यांच्या भागात येणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी नागरीकांना भेट देतील.नगरसेवकांशी समन्वय साधून स्थानिक पातळीवर उत्तम प्रशासन देण्यासाठीची ही योजना आहे. सिव्हिल लाइन्स, रोहिणी, नजफगड, नरेला, केशवपुरम, पश्चिम विभाग, सदर, करोल बाग, शाहदरा उत्तर, मध्य, दक्षिण आणि शाहदरा दक्षिण हे 12 झोन आप ने केले आहेत, असे शनिवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. आप नेते आदिल खान हे सिव्हिल लाइन्स, रोहिणी आणि नजफगढचे प्रभारी असतील, तर सौरभ भारद्वाज नरेला, केशवपुरम आणि पश्चिम विभागाची देखरेख करतील.सदर, करोलबाग आणि शाहदरा उत्तरची जबाबदारी दुर्गेश पाठक यांच्याकडे तर मध्य, दक्षिण आणि शाहदरा दक्षिणची जबाबदारी आतिशी यांच्याकडे असेल, असे त्यात म्हटले आहे. सर्व नगरसेवकांशी समन्वय साधणे एका व्यक्तीला शक्य नव्हते आणि त्यामुळे आता ही जबाबदारी चार लोकांमध्ये विभागली गेली आहे. सर्व नगरसेवक या चार ज्येष्ठ ‘आप’ नेत्यांच्या थेट संपर्कात राहतील आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे सहकार्य मिळेल. हे ज्येष्ठ नेते नगरसेवकांबाबत अहवाल तयार करतील, त्याआधारे त्यांचा समित्यांमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.