‘आपलं सरकार, लाडकं सरकार’ विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री शिंदेनी दिली,’नवी घोषणा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील जगदंबा माता मंदिरात पूजा केली. पोहरादेवी याठिकाणी असलेले हे मंदिर धार्मिक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. पंतप्रधान मोदींनी मंदिर परिसरात पोहोचून विधीवत पूजा केली आणि देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला आणि मंदिराच्या महत्वाबाबतही चर्चा केली.
दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी शिंदे यांनी राज्यातील सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले,’ लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं. महिलांच्या खात्यात तीन टप्प्यातील साडे चार हजार जमा झाले आहेत. कुणी माईचा लाल लाडकी बहिण योजना बंद करू शकत नाही. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआवर टीका केली. तसंच आपलं सरकार आता लाडकं सरकार झालेलं आहे, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
‘आपलं सरकार, लाडकं सरकार’
लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे. आमच्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. विरोधक म्हणतात की आम्ही ही योजना बंद करू. पण आज मी इथं सांगू इच्छितो की कुणीही ही योजना बंद करू शकत नाही. आमचं सरकार सर्व वर्गातील लोकांना न्याय देण्याचं काम करत आहे. त्यामुळे ‘आपलं सरकार, लाडकं सरकार’ झालेलं आहे, असं म्हणत शिंदेंनी विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ नवी घोषणा दिली.
शिंदे पुढे म्हणाले,’या कार्यक्रमासाठी बंजारा समाज एकत्र आला आहे. ‘बंजारा विरासत’चं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे. सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा, असा हा दिवस आहे. हा आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. आज ‘बंजारा विरासत’चं लोकार्पण झालं. यात बंजारा समाजाचा इतिहास आणि परंपरा दाखवण्यात आली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.





